चिखलदरा म्हणजे विदर्भाच महाबळेश्वर, अमरावती पासून ८० ते ९० किमी अंतरावर हे थंड हवेच ठिकाण म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. मेळघाट अभयारण्यामधे येणारा हा भाग व आजूबाजूची आदिवासी गावे निसर्गसंपत्तीने बहरलेली आहेत. चिखलदरा तालुक्यात प्रामुख्याने कुरकु, गवळी, व काही प्रमाणात गोंड आदिवासी जातींचा रहिवास आढळतो. हे लोक प्रामुख्याने शेती व शेतमजुरी या कामांवर रोजचा गुजारा करतात. पण अलीकडे वाढलेल्या वातावरण बदलाच्या परिणामामुळे शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, लागत खर्च सुद्धा परत निघत नाही. घरी खाण्यासाठी धान्य पूरत नाही मग शेतीतून विकून कमवण खूप लांबची गोष्ट. जास्ती करून हा समाज मनरेगा वर अवलंबून आहे, अस या भागात मनरेगा माध्यमातून रोजगारनिर्मितीसाठी काम करणारे नयन गवांदे म्हणतात. जैतादेही, महसुलिगड, मनभंग या गावांना भेटी दिल्यावर आदिवासी शेतकरी किती हवालदील झाला आहे हे दिसून आला. प्रामुख्याने कापूस, सोयाबीन हि पिके घेणारा शेकतरी आज वातावरणीय बदलाच्या परीणामामुळे 60 ते 70 टक्के नुकसान सोसत आहे. बहुतांश आदिवासी घरांमधे लाईट नाहीये याचा कारण म्हणजे या लोकांच्याकडे फ्रीज, एसी सारख्या वस्तू नसताना १० हजारपासून ३० हजारापर्यंत लाईट बिल दिला जात. त्यामुळे बहुतांश लोकांना बिल भरणे परवडत नाही आणि मग लाईट कंपन्या याचा लाईट कनेक्शन बंद करतात.
प्रत्येक डिसेंबरच्या सुरूवातीपसून या भागातील बरेच गवळी आदिवासी गाव सोडून जायला सुरवात करतात, आणि पावसाळा सुरू होण्याच्या आधी माघारी येतात. याचा कारण म्हणजे उन्हाळ्यात गुरांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध नसतो. यालाच "हेटी"अस म्हणतात.
हेटी
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातू येथील आदिवासी कुटुंबाला गॅस वाटप झालेला आहे, पण पुन्हा गॅस भरून घेण्याची आर्थिक क्षमता नसल्याकारणाने या सोईचा फायदा त्यांना घेता येत नाही. वातावरण बदलामुळे शेतात दुबार, तिनबार पेरणी करून सुद्धा म्हणावे इतका उत्पन्न भेटत नाही. मनभंग गावचे आदिवासी शेतकरी शामलाल दहीकर सांगत होते रोगराई वाढून आरोग्यावरील खर्च वाढला आहे पण शेतीचा उत्पन्न निम्मं पण राहिलेला नाही. मनरेगा ( महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) हि योजना या भागातील लोकांसाठी संजीवनी म्हणून काम करते. गेल्या दोन वर्षापासून पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वैभव नायसे व शिव टेके हे दोन तरुण कार्यकर्ते आदिवासी लोकांच्याबरोबर त्यांच्या शेतीत नविन प्रयोग प्रयोग करून शेतीतील उत्पन्न वाढ करण्यासाठी झटत आहेत.
चिखलदरा पायथ्याला घाट उतरवून खाली आल्यावर एकलासपूर व परतवाडा रोड ला दोन्ही बाजूला संत्र्याच्या बागा नजरेस पडतात, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार याच भागातून सर्वात जास्त संत्री नागपूर मार्केटला जातात . पण गेल्या चार ते पाच वर्षांत अवकाळी पावसामुळे संत्र्यावर येणारी रोगराई वाढलीय. चंद्रभागा आणि सापण नदीवर बांधलेल्या धरणांमुळे ग्राउंड वॉटर लेव्हल खूप वर आली आहे, त्यामुळे संत्र्याची मुळे कुजत आहेत. काही वर्षापूर्वी याच संत्र्याच्या जिवावर करोडपती झालेले बागायदार आज संत्र्याच्या बागा तोडून जमीन विकायला काढत आहेत. आज एवढी वाईट परस्थिती आहे की लागत खर्च निघणं सुद्धा मुश्किल झाला आहे. आणि आश्चर्य म्हणजे एवढ्या मोठ्या संत्रा उत्पादन भागात प्रोसेसिंग युनिट नाहीये अस स्थानिक लोकांकडून समजल. वातावरणीय बदल व मानवनिर्मित धरणामुळे होणारे शेतीचे नुकसान असे दुहेरी संकट या भागातील शेतकऱ्यांच्या वर आलेला आहे. पाच वर्षांपूर्वी जो संत्र्याचा दर होता अजूनही तोच आहे पण लागत खर्च वाढत आहे तरीसुद्धा उत्पन्नात वाढ होत नाही. अशा या सर्व कारणामुळे लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून आजार व त्याचबरोबर आरोग्यावरील खर्च वाढत आहे.या दृष्ट चक्रात या भागातील आदिवासी व सामान्य शेतकरी अडकून पडलेला आहे.
Shubham Gurav
MSc environmental science.
SUK. Kolhapur.
वास्तववादी वर्णन, बहुधा जे लोकं वातावरणीय बदलासाठी जबाबदार नसतात हास्य लोकांनाच त्याचा सामना करावा लागतो!