top of page

थोरोच्या शब्दांत निसर्गभाव आणि मनुष्यस्वभाव, निर्जनाचे टॉनिक, आणि अज्ञाताचे मोल

Writer's picture: YouthForNatureIndiaYouthForNatureIndia

Updated: Jul 12, 2021

आज हेन्री डेव्हिड थोरो या अमेरिकन तत्ववेत्त्याची दोनशे चारावी जयंती. त्याच्या जयंतीच्या निमित्ताने अमेरिकेत राष्ट्रीय साधेपणा दिवस पाळला जातो.

त्याच निमित्ताने मारिया पोपोवा या तरुण आस्वादिकेच्या लेखाचा हा अनुवाद.


"एकीकडे सगळं अगदी नवलाईने समजून घेताना, शोधून काढतानाच आपल्याला सगळ्या गोष्टी गूढ आणि असाध्य राहायला हव्या असतात."


मारिया पोपोवा


"समांतर दुनियेच्या सफरी" या प्रखर कवितेत डेनिस लिव्हरटोव म्हणते, "आपण त्याला 'निसर्ग' म्हणतो, पण आपणही 'निसर्ग'च असल्याचे मान्य करताना कचरतो." तिच्या मागच्या पिढीत जगाच्या इतिहासातील सर्वात काव्यमय अशा कायद्यात त्या समांतर दुनियेलाच वन्यप्रदेश संबोधून त्याची व्याख्या केली होती "असा प्रदेश जिथे धरती आणि तिची सजीवसृष्टी मानवाच्या आक्रमणाची शिकार झालेली नसून तिथे मानवसुद्धा एक कायम राहायला न आलेला पाहुणाच असतो."


चर्च, मंदिरे आणि बैठकांना जाणाऱ्या लोकांप्रमाणेच वन्य किंवा निर्जन प्रदेशात मुशाफिरी करणाऱ्या लोकांचा अनुभव सारखाच असतो. तिथून आपण एकाच वेळी मोडून आणि घडून येत असतो, एकाच वेळी गर्वित आणि नम्र होऊन येत असतो, एकाच वेळी प्रसरून आणि त्याहून मोठ्या पसाऱ्यात विरघळून परत येत असतो. आपण तिथे जातो कारण आपल्या अस्तित्वाच्या कवितेची काही कडवी तिथे नव्याने रचली जातात. पण अर्थात ही रचना क्वचितच शब्दांत उतरते.


थोरोने त्याच्या 'वाल्डन'मध्ये हीच अव्यक्त जाणीव कमालीच्या भावूक आणि अनोख्या तरल भाषेत मांडली आहे. हेन्री डेव्हिड थोरो (१२ जुलै १८१७ - ६ मे १८६२) निसर्गाला एक प्रकारची प्रार्थना समजत असे. त्याने तिशीत पाऊल टाकायच्या आधीच वाल्डन तळ्याकाठी एकट्याने जगण्याचा जगावेगळा प्रयोग करून बघितला होता. त्याचे हे पुस्तक.

तो लिहितो:


आपल्याला निर्जनाचं टॉनिक लागतं. तळ्याकाठी पसरलेल्या दलदलीत बगळे आणि पाणकोंबड्या बघत भटकावं, पाणलाव्याचं घुमणं ऐकावं. लव्हाळ्याची कुजबुज ऐकावी, त्याचा वास घ्यावा, त्यात दडलेलं अनोळखी पक्ष्याचं घरटं निरखावं, दबकत चालणाऱ्या पाणमांजराकडे पाहावं. एकीकडे सगळं अगदी नवलाईने समजून घेताना, शोधून काढतानाच आपल्याला सगळ्या गोष्टी गूढ आणि अज्ञात राहायला हव्या असतात. जमीन आणि समुद्र अनंतपणे निर्जन राहायला हवेत. आपल्याला त्यांचा थांग लागू नये कारण ते अथांग आहेत.



राचेल कार्सन म्हणते तसं "आपली मुळं जमिनीत आहेत..." आणि त्यामुळे "निसर्गाशी आपलं गहिरं नातं आहे, हे नातं आपल्या मानवतेचं अविभाज्य अंग आहे." शंभर वर्षांपूर्वीच थोरोने तिला पुस्ती जोडून ठेवली होती:


निसर्ग कधीच कंटाळवाणा नसतो. तिथल्या सळसळत्या चैतन्याच्या दर्शनाने आपण ताजेतवानेच होतो: विस्तीर्ण आणि भव्य भुरुपे, समुद्र किनाऱ्यावर कोसळणारे कडे, फुलणाऱ्या आणि कुजणाऱ्या झाडांनी गच्च जंगले, कडाडणाऱ्या विजा आणि आठवडेच्या आठवडे संतत पडणारा पाऊस, त्याने हिरवे धुमारे फुटलेली धरणी. आपल्या मर्यादांच्या पलीकडे जायला हवं, कधीच न पाहिलेल्या कुरणांचे दृश्य पाहायला हवं.


निसर्ग आपल्याला कधीच पुरा पडणार नाही कारण निसर्ग ही काही कुठली ताब्यात घ्यायची वस्तू नाही. निसर्ग म्हणजे आपण स्वतःच. थोरोला जाऊन युगे उलटली असली तरी आजही आपण ट्रेकिंगची काठी किंवा एखादी कविता घेऊन निर्जनाच्या प्रदेशात शिरतो तेव्हा आपल्या मर्यादांच्या पार गेल्याची जाणीव होते. आपण आखलेल्या सीमा धूसर होतात, त्यांच्या योगाने ते अतीव संकुचित आणि त्रासदायक मूलभूत असत्यसुद्धा धूसर होत जातं. या असत्यावरच आजची सगळी भोगवादी-चंगळवादी व्यवस्था उभी आहे. ते असत्य आहे - आपल्या व्यतिरिक्त उरलेली सर्व सजीवसृष्टी म्हणजे एक समांतर विश्व आहे, त्या विश्वात शिरून हवे ते अनुभव आणि वस्तू काढून आणायच्या आणि आपलं मानवी विश्व सजवायचं आणि समृद्ध करायचं.


निसर्ग उध्वस्त करत जाण्याचा - म्हणजेच आपल्यालाच उध्वस्त करत जाण्याचा - आपला मार्ग बदलण्यासाठी पुरातन निसर्गवासी स्वयंपूर्ण जीवनशैली अंगीकारायची हा उपाय भाबडा आणि अव्यवहार्य वाटतो. तशा प्रकारचं निर्भोग, निर्मनुष्य जीवन वॉल्डनच्या तीरावर जगण्याचा खुद्द थोरोचा प्रयत्नसुद्धा काही महिनेच टिकला होता.


मग करावं काय? आपल्याला काही गैरसमजातून बाहेर पडायला हवं. पहिला म्हणजे ही दोन समांतर विश्वे समजण्याचा. दुसरा म्हणजे निसर्गात मनुष्य केंद्रस्थानी असून त्याच्या सभोवती पर्यावरण आहे हा. आणि तिसरा निसर्गासाठी वाईट असलेली कोणतीही गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल हा.

हे तिसरं इतकं मूलभूत आहे पण मला माझ्या किराणा स्टोअरमध्ये गेल्यावर प्रकर्षाने आजच्या संस्कृतीशी विरोधी जाणवतं. तिथे आपल्या आरोग्यासाठी हितकर अशी सेंद्रिय फळे, भाजीपाला विकायला असतात. पण तो असतो फोमट्रेमध्ये प्लास्टिक वेष्टनात. आता हे सगळं पॅकिंग हजारो वर्षे कुठल्या तरी खड्ड्यात अगदी सावकाश सडत राहील, अतर्क्य असं विष जमिनीच्या गर्भात कालवत. त्या स्टोअरच्या मालकाशी बोलून बदल करायचं आवाहन करणं ही एक लहानशी संघर्षाची कृती असते. लहानशी पण नगण्य नव्हे आणि भाबडी तर नक्कीच नाही. 'वॉल्डन'च्या शेवटी थोरो म्हणतो:


"जर तुम्ही हवेत इमले बांधले असतील तर ते कोसळतील म्हणून भांबावून जाऊ नका. इमले हवेतच असतात. आता फक्त त्यांचा पाया भरायला घ्या."


मूळ लेख वाचण्यासाठी https://www.brainpickings.org/?s=Thoreau



प्रा विनायक पाटील

(अनुवादक हे वनशास्त्र महाविद्यालय ,दापोली येथे प्रध्यापक व संशोधक आहेत)

244 views0 comments

Recent Posts

See All

CITES

Comments


Get social with us!

We are committed to the conservation of Nature. Awareness is the most effective way to make people environment literate. We can make people aware through education, research, and various activities. When people become environment literate, they form a group of Environment-conscious citizens.

  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
Share your thoughts!

 

​Telephone : ​+91 7378777067

Email : youthfornatureindia@gmail.com

​​​

© 2020 by YouthForNature

bottom of page