औरंगाबाद म्हणजेच आत्ताच्या संभाजीनगरच्या जवळून अगदी बारा किलोमीटरच्या अंतरावर माळीवाडा म्हणून गाव आहे. तशी या गावातील जास्तीची लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. पण गोंड जमातीतील आदिवासीही या गावात मोठ्या प्रमाणात राहतात. मी जेव्हा मराठवाडा विभागांमध्ये आदिवासी लोकांच्या जीवनावर वातावरण बदलाचा परिणाम कशा पद्धतीने होत आहे याचा अभ्यास दौरा करत होतो, तेव्हा माझ्या वाचनात टाइम्स ऑफ इंडिया व द प्रिंट या वृत्तपत्रातील लेख आले, त्यामध्ये माळीवाडातील आदिवासी समाजासाठी काही सामाजिक संस्थांनी कोरोना काळात केलेल्या मदती बद्दल वाचलं. यावेळी मी संभाजीनगर या मेट्रोपॉलीटीयन शहरात झालेल्या वातावरण बदलाच्या परिणामाबद्दल लोकांचे इंटरव्यू घेत होतो. जवळच माळीवाडा असल्याने मी जायचे ठरवले. जेव्हा गावात पोचलो तेव्हा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी गेलो कारण शिक्षक गावाच्या सर्व स्थितीचा माहितीगार असतो असा माझा सर्वेच्या काळात आलेला अनुभव, पण इथे तो अनुभव चुकीचा ठरला आणि आदिवासी समाजाचे नाव घेताच आधी हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करणाऱ्या मुख्याध्यापकांनी मी आता खूप कामात आहे माहिती देऊ शकणार नाही असं सांगितलं. नाईलाजाने ऑफिस मधून बाहेर आलो आणि गावच्या ग्रामपंचायत मधे जायचं ठरवलं. गावच्या सरपंच महिला होत्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलो तर शिपायाकडून सांगण्यात आले की सरपंचांना भेटायला त्यांचे नातेवाईक आलेले आहेत त्यामुळे मला क्लार्क कडे पाठवण्यात आलं. त्यांच्याशी विचारपूस केल्यावर त्यांनी मला आदिवासी पाडा कुठे आहे कोणाकडून तिथे सहकार्य होईल याची माहिती दिली. याच क्लार्क ची बायको आदिवासी वाड्यात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. मुख्य गावापासून साधारण अर्धा किलोमीटर दूर हायवेच्या कडेला फक्त दगडी जमीन असणाऱ्या रखरखत्या उन्हात या गोंड आदिवासींची घर दिसू लागली. घर कसली झोपड्यास त्या बाजूने साड्या लावलेल्या वरून पाऊस येऊ नये म्हणून प्लास्टिकचा कागद लावलेला खाली दगडी जमीन त्यामुळे शेणाने सारवण्याचा प्रश्नच उरत नाही. दुपारची वेळ असल्याने बहुतेक लोक कामासाठी बाहेर गेलेले. चार ते पाच झोपड्या सोडून लोखंडी खुर्चीवर 70 ते 75 वर्ष वय असणारे रुबाबदार आजोबा मिश्यांना पिळ देत बसलेले. त्यांच्याशी विचारपूस झाल्यावर मी कशासाठी आलो आहे हे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी अंगणवाडी सेविका जी ग्रामपंचायत मधील क्लार्क ची बायको होती तिला एका पोराकडून बोलावणं धाडलं. त्या पण अंगणवाडीची सर्व काम उरकून निघतच होत्या, येथे अंगणवाडी चे वर्ग झाडाखाली भरतात कित्येक वर्ष बांधिव खोलीची मागणी करून पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आढळत. आज सुद्धा काही भागात प्राथमिक शिक्षणासारखा मूलभूत हक्क मिळवण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत हे राजकीय मागासलेपण बोचत राहत.
गोपीचंद बाबा
शेजारच्याच एका झोपडीतील किराणा मालाच्या दुकानातील कॉटवर बसून आमच्या गप्पा सुरू झाल्या. या अंगणवाडी सेविका गेली कित्येक वर्ष या ठिकाणी कार्य करत आहेत त्या सांगतात कित्येक सामाजिक संस्था येतात आणि तात्पुरती मलमपट्टी करून, स्वतःचे फोटो काढून जाहिरात बाजी करून या लोकांच्या परिस्थितीचे भांडवल करून निघून जातात. मध्येच गोपीचंद बाबा जे की मिश्यांना पीळ देत होते ते बोलायला सुरुवात करतात आणि गोंड जातीच्या इतिहासापासून ते आत्ता आमची परिस्थिती अशी का आहे याबाबत न थांबता पंधरा मिनिटे बोलतात. हेच गोपीचंद बाबा मुख्यत करून जंगलातील औषधे वनस्पती घेवून येतात व त्यांचे औषधे बनवून विकतात पण वयाच्या मानाने आता ते शक्य नाही. मोठमोठे सरकारी अधिकारी त्यांचे झाडपाल्याचे औषधे वापरतात असा त्यांचा दावा. ह्या वाड्यात जेमतेम 30 ते 35 झोपड्या असतील एकाही झोपडीत ना लाईट, ना गॅस,त्यात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे कुटुंबनियोजन नाही, त्यामुळे एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतही प्रत्येकाची पाच ते सहा मुलं असणं साहजिकच. अंगणवाडी सेविकेच्या म्हणण्यानुसार येथील बहुतांश मुले शाळेत यायचं कारण म्हणजे शाळेत मिळणारे मध्यान भोजन, येथील मुलं थोडी मोठी झाली की मजुरीचे काम करायला आसपासच्या शहरात जाणार आणि मागे राहिलेल्या महिला आसपासच्या गावात जाऊन भीक मागून पोट भरणार असा यांचा रोजचा दिनक्रम. एक अनुभव असा आला की तीन दिवसांपूर्वी बाळतीन झालेली एक बाई त्याच्या तीन दिवसाच्या मुलाला घेऊन भीक मागायला गेलेली होती आणि मागे तिची चार मुले झोपडीत खेळत बसलेली. बाळंतीण झाल्यावर आराम वगैरे असला प्रकार यांना माहीतच नाही बाळंतपणा नंतर काही तासातच बाळंतीण बाई कामास लागते असा अंगणवाडीच्या सेविका सांगतात.
अंगणवाडी सेविका
शिक्षण हे कोणत्याही समाजासाठी मान वर काढून जगण्याच एकमेव साधन आहे त्याच हक्कापासूनच ते वंचित आहेत. बारावीच्या पुढे येथे कोणीही शिकलेला नाही, बोलता बोलता मी त्यांना प्रश्न केला की सरकारने आदिवासी लोकांसाठी एवढ्या सवलती व योजना तयार केलेल्या आहेत, आरक्षण दिलेला आहे, यासाठी तुम्ही का प्रयत्न करत नाही, या कल्याणकारी योजनांचा फायदा तुम्ही का घेत नाही. माझं बोलणं मध्येच थांबवत अंगणवाडी सेविका म्हटल्या, की यांना अजून साधा आधार कार्ड भेटलेला नाही का जातीचे प्रमाणपत्र मग हे लोक योजनांचा लाभ घेणार तरी कसे. काही वर्षांपूर्वी गावात सरपंच पद एस टी समाजासाठी राखी होतं पण कोणाकडेही जातीचा दाखला नसल्यामुळे ते पद रिक्त राहिले व याच्या आडून उपसरपंच कामे पाहू लागला. वातावरण बदलाच्या परिणामावर विचारलं तर खूप अस्वस्थ करणार उत्तर मिळालं ते म्हणजे गोपीचंद बाबा म्हणतात आपण जिथे बसलो आहोत तिथे गुडघाभर पाणी असते पावसाळ्यात चार ते पाच दिवस खाटेवर बसून काढावे लागतात. लहान लेकरांना थंडीपासून वाचवणे हे जिकीरीचा होऊन बसत. याच्यातूनच मग रोगराईचा प्रमाण वाढतं पावसाळ्यात रोजगार उपलब्ध नसल्याने उपासमारी वाढते. मधेच येणारा अवकाळी पाऊस व जोराचा वारा झोपड्या उध्वस्त करतो, नंतर त्या उभा करताना बराच खर्च होतो. घरकुल व आवास योजना मंजूर झाल्या पण राजकीय वाटाघाटीत ते अजून अडकून पडलेले आहे. जगणं खरंच किती अवघड असतं हे या माळीवाडीतील गोंडवाड्यात पाहायला मिळाल.
Shubham Gurav
MSc environmental science.
SUK. Kolhapur.
read more blogs regarding climate change click on the given link
Commentaires